ब्रेकिंग न्यूज

दुर्गा टेकडी: अभियांत्रिकी विश्वातील तीन क्षेत्रांचा संगम असलेला देशातील एकमेव प्रकल्प

Share

भोपाळ, मध्य प्रदेश येथे शहर विकास मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे (IAS) यांनी निगडी येथील दुर्गा टेकडी बद्दल असलेल्या आपल्या भावना आणि काही आठवणी सांगितल्या आहेत.

वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें।

पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।

नाहीं गुणदोष अंगा येत ॥२॥

आकाश मंडप पृथिवी आसन।

रमे तेथे मन क्रीडा करूं ॥३॥

कंथा कमंडलू देह उपचारा |

जाणवितो वारा अवसरू ॥४॥

हरिकथा भोजन परवडी विस्तार।

करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥

तुका म्हणे होय मनासी संवाद।

आपुलाचि वाद आपणांसी ॥६॥

– संत तुकाराम महाराज

माझ्या जीवनातील आठवणींच्या कप्प्यातील सर्वात मोठा भाग हा दुर्गा टेकडीचा आहे. कदाचित इतर कोणालाही अतिशयोक्ती वाटेल, परंतु शाळेत अक्षर ओळख एबीसीडी (अ ब क ड ) शिकल्यानंतर माझ्या कानावर सर्वात जास्त वेळा पडलेला शब्द म्हणजे दुर्गा टेकडी आहे. थोडक्यात माझ्या आयुष्यात श्वासानंतरचे दुसरे कुठले स्थान असेल तर ते म्हणजे माझे आईवडील व‌ निसर्ग होय. त्याचं सर्व श्रेय

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक असलेले माझे वडील स्वर्गीय शांताराम भोंडवे यांना मी देतो. त्यांच्या सहवासात निसर्ग, पर्यावरण, वृक्ष आणि झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी या सृष्टीच्या अंतरंगाचा घनिष्ठ संबंध शालेय जीवनापासूनच बाबांमुळे माझ्या हृदयावर कोरला गेला. मला आठवतंय, म्हणजे अगदी वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षाचा असेन मी त्या काळात..मध्यरात्री आमच्या घरचा लँडलाईन फोन वाजला की नक्की काहीतरी दुर्घटना झाली असणार ? आणि आता बाबांना जावे लागणार.. अशी जणू आम्हाला सवयच लागली होती.

82550 हा आमच्या घरचा पाच आकडी फोन नंबर मला आजही आठवतो. नगरपालिका काळात जेव्हा उद्यान विभाग सुरू झाला तेव्हापासून माझे बाबा उद्यान विभागात अधिकारी म्हणून नोकरीस होते. उद्यान विभागाचा मुकुटमणी अर्थात कोहिनूर हिरा म्हणजे दुर्गा टेकडी..! शहराची अस्मिता व ओळख असलेल्या दुर्गा टेकडीवर तेव्हा सारखी आग लागायची, म्हणजेच वनवा पेटायचा.. मग रात्री अपरात्री बाबांना फोन यायचा, आम्ही झोपेतच असायचो, परंतु बाबा दुर्गा टेकडीकडे निघालेत.. अशी जाणीव जरूर व्हायची. पहाटे किंवा सकाळी बाबा घरी आल्यानंतर मग आम्हाला रात्री काय प्रकार झाला तो समजायचा.

झाडं, पाणी, खड्डा आणि माती हे चार शब्द इतक्या असंख्य वेळा माझ्या कानावर पडायचे की विचारता सोय नाही, पर्यायाने साहजिकच निसर्गाची, पर्यावरणाची, सृष्टीच्या या विलोभनीय विश्वाची ओळख मला घरातूनच झाली. दुर्गा टेकडीवर कधी बाबांबरोबर तर कधी एकटा मी इतक्या वेळा गेलोय की या टेकडीचा कोपरा न कोपरा व इंच इंच जागा मला आजही पाठ आहे .दहावी बारावी झाल्यानंतर शहराला लाभलेल्या या अलौकिक देणगीची म्हणजेच दुर्गाटेकडीची खूपच शास्त्रीय ओळख मला नंतर झाली.

गुजरात पासून केरळ-तामिळनाडू पर्यंत जी पश्चिम घाटाची डोंगररांग आहे ज्याला आपण सह्याद्रीची रांग म्हणतो त्या रांगेमधील एक टेकडी म्हणजे दुर्गा टेकडी आहे. अतिशय काळा, कठीण व कडक खडक म्हणजे बसाल्टने ,(दगड) वेढलेली ही टेकडी आहे. आज जेवढी दुर्गा टेकडी महापालिकेच्या ताब्यात आहे तो अवघा ३० टक्के भाग आहे, उरलेला टेकडीचा ७० टक्के भाग संरक्षण विभागाच्या हद्दीत येतो.

पिंपरी चिंचवड शहराची ओळख जरी औद्योगिक नगरी अशी असली तरी सर्वात जास्त हिरवाईने नटलेले एकमेव शहर ही या शहराची दुसरी बाजू आहे. दुर्गा टेकडी तर शहराचा आत्मा म्हणावा लागेल. माझ्या वडिलांनी मोबाईल नर्सरी, सुंदर बाग स्पर्धा असे अनेक उपक्रम सुरू करून शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत उद्यान विभागाच्या कामाची माहिती पोहोचवण्याचे काम केले. श्रीनिवास पाटील, जयराज फाटक ते स्थानिक अधिकारी आर.बी. कोंडे ,एस.एल.शेळके, पद्माकर खोपे यांनी सदैव उद्यान विभागातील बाबांच्या कल्पनांना मूर्त रूप देण्याचे काम केलं. दुर्गा टेकडी आणि हरनाम सिंह यांचा संबंध व नाते कोणीच विसरू शकत नाही.

या शहरावर दुर्गाटेकडीच्या माध्यमातून हिरवी शाल पसरवण्याचं काम हरनाम सिंह यांनी केलं, बाबांनी त्यांना साथ दिली. जगात कुठेच एकत्र आढळणार नाहीत इतके विविधरंगी सरडे, सरपटणाऱ्या प्रजाती तसेच मोर ,तरस, हरिण ते बिबट्या हे प्राणी आपल्या शहरात मुक्त वातावरणात व मोकळेपणाने राहतात हे कोणाला सांगितले तर आज आश्चर्य वाटू शकते, परंतु हे वास्तव आहे. आयएएस झाल्यानंतर मध्य प्रदेश या राज्याची केडर म्हणून निवड झाल्यानंतर शहरी वनीकरण योजना राबविण्याची संधी मला मिळाली. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात त्याप्रमाणे मला काम करता आले याचा पाया व‌ घट्ट मूळे माझ्या जीवनात असलेल्या निसर्गाच्या स्थानामुळे ती रोवली असल्यामुळे मला काम करता येत आहे. असो, तर दुर्गा टेकडीकडे जाणारी जी वाट आहे त्याच्या पायथ्याशी भक्ती शक्ती शिल्प असणं व दुर्गाटेकडीचे ते प्रवेशद्वार असणं.. हा अपूर्व योगायोग म्हणता येईल. त्यामुळेच सामाजिक, पर्यावरणीय आणि बांधकाम या तिन्ही क्षेत्रांचा अद्वितीय संगम साधणारा तसेच त्याचे यशस्वी मॉडेल साकार करणारा इंजीनियरिंग विश्वातील देशातील एकमेव प्रकल्प म्हणजे दुर्गा टेकडी होय.

संकेत भोंडवे (IAS)

सचिव, शहर विकास मंत्रालय, भोपाळ, मध्य प्रदेश