ब्रेकिंग न्यूज

मद्यधुंद महिलेचा पोलीस चौकीत गोधळ, नऱ्हे पोलीस चौकीतील घटना

Share

पुणे – एका मद्यधुंद महिलेने तब्बल दोन ते तीन तास पोलीस चौकीत प्रचंड गोंधळ घातला. ही घटना नऱ्हे पोलीस चौकीमध्ये घडली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरातील रस्त्यावर ही महिला मद्याच्या नशेत धुंद होऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या महिलेला ताब्यात घेऊन नऱ्हे पोलीस चौकीत आणले.

या ठिकाणी या महिलेने केवळ पोलिसांशी हुज्जतच घातली नाही, तर पोलीस चौकीतील सरकारी साहित्याची फेकाफेक करत कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.

पोलिसांनी संबंधित महिलेला ससून रुग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले.

सार्वजनिक ठिकाणी शांतताभंग करणे, मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौकीतच झालेल्या या प्रकारामुळे नऱ्हे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.