पुणे- पहिल्या पत्नीला विश्वासात घेऊन तिची मोठी आर्थिक फसवणूक केली. तसेच तिला अंधारात ठेवून दुसरे लग्न केले. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पहिल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचा एक धक्कादायक प्रकार पुण्याच्या चऱ्होली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चऱ्होली येथील ‘आस्था डेव्हलपर्स’ बिल्डिंगमध्ये घडला आहे. संशयित पतीने आपल्या पहिल्या पत्नीला विविध कारणांसाठी विश्वासात घेऊन तिला मोठ्या प्रमाणात आर्थिक गंडा घातला. नंतर त्याने पहिल्या पत्नीपासून कायदेशीर घटस्फोट न घेताच गुपचूप दुसरे लग्न उरकून घेतले.
पतीच्या या दुसऱ्या लग्नाची आणि फसवणुकीची कुणकुण लागताच, पीडित पत्नी जाब विचारण्यासाठी चऱ्होली येथील फ्लॅटवर गेली. तेथे दोघांमध्ये वाद झाला. त्यातून पतीने पत्नीला लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली. पतीने केलेल्या अमानुष मारहाणीत पहिली पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे चऱ्होली आणि दिघी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळवून देऊन आरोपी पतीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
