सायबर फसवणूकसाठी म्युल अकाउंटचा वापर करणारी टोळी गजाआड ; वानवडी पोलिसांची कारवाई

पुणे – सायबर फसवणुकीसाठी बनावट बँक खात्याचा (म्यूल अकाऊंट) वापर करणार्या टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने काढलेल्या बँक खात्यात देशभरातील एकूण १९ नागरिकांचे सायबर फसवणुकीतील १ कोटी ८० लाख १५ हजार ७९५ रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
श्रवण राजेंद्र अंकुशे (वय २५, रा. उरळी देवाची, पुणे-सासवड रस्ता), हरिओम हरिराम साहू (वय २४, रा. सिद्धार्थनगर, साळुंके विहार, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), सौद इदफान शेख (वय २३), साहिल रौफ शेख (वय २५, दोघे रा. जयजवाननगर, येरवडा), तालीब नूरमोहम्मद शेख (वय २५, रा. मोहनवाडी, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
महाराष्ट्र सायबर विभागाकडे सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांसाठी बनावट खात्यांचा वापर झाल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी सायबर विभागाने वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींनी त्यांचे नावे म्युल अकाऊंट (बनावट खाते), त्याचे केवायसी दस्ताचे आधारे सुरु केले. या खात्यांवर एकूण ६ लाख ९ हजार ७३० रुपयांचे आर्थिक व्यवहार करण्यात आले. सायबर गुन्ह्यात देशभरातील १९ जणांची फसवणूक झाली होती. फसवणुकीतील रक्कम पुण्यातील पाच आरोपींच्या खात्यात जमा झाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा श्रवण अंकुशे हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळाली होती.
आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती काढली होती. अंकुशे याने त्याचा साथीदार साहू याच्यामार्फत साथीदार सौद शेख, साहिल शेख, तालीब शेख यांना बनावट बँक खाते काढण्यास सांगितले होते. सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम बनावट खात्यात जमा झाल्यानंतर फसवणुकीच्या प्रत्येक व्यवहारांमागे पाच हजार रुपये देण्यात येईल, असे आरोपी अंकुशे, साहू यांनी शेख यांना सांगितले होते. अंकुशे याने या खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यातील रक्कम जमा करून घेण्यासाठी केला होता. देशभरातील १९ जणांची एक कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. सायबर फसवणुकीतील रक्कम अंकुशे याने साथीदारांच्या बनावट खात्यात जमा करून घेतली होती. या प्रकरणी अंकुशे याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे, समाधान उगले, पोलीस अंमलदार गणेश आगम, अमोल पिलाणे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दया शेगर, आशिष कांबळे, दीपक क्षीरसागर, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, अभि चव्हाण, गोपाळ मदने,विष्णु सुतार, चैत्राली यादव, रुपाली दिवटे यांनी केली आहे.






