पिंपरी- मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी हातभट्टी दारू सेवनामुळे २१ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली. हडपसर आणि दापोडी- फुगेवाडी परिसरात ही भीषण घटना २६ मे ते २८ मे २०२६ या दरम्यान घडली होती. या गुन्ह्यातील आरोपींच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी हातभट्टी दारूचे सेवन केल्याने हडपसर परिसरातील चार, तर दापोडी-फुगेवाडी परिसरातील १७ अशा एकूण २१ जणांचा मृत्यू झाला होता. नागरिकांनी २६ मे रोजी रात्री या दारूचे सेवन केले होते, ज्याचे गंभीर परिणाम आणि मृत्यू २८ व २९ मे २०२६ रोजी प्रामुख्याने समोर आले होते.
या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरु असून आता आरोपींच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी त्याला मंजुरी दिली.
योगेश व्हनकडे, राधेश्याम प्रजापती, कल्पेश अग्रवाल, आर्यन धोत्रे, अभिषेक चौबे, अरुण चौबे आणि अंकित चौबे यांच्यासह संघटित गुन्हेगारी टोळी तयार केल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री करून आर्थिक फायदा मिळवल्याचा तपासात निष्कर्ष निघाला आहे. या टोळीतील सदस्यांविरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा झाली नसल्याचे तपासात आढळले.
ही कारवाई अपर पोलीस महासंचालक (गुन्हे) सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ आणि पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपाधीक्षक शामराव काळे यांनी केली
