मालवणमध्ये एटीएमकार्ड चोरणाऱ्या भामट्याला ८ वर्षानंतर पुण्यात ठोकल्या बेड्या

पुणे- महिलेचे एटीएम कार्ड चोरून तिच्या खात्यातून ३ लाख ४३ हजार ७०० रुपये काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अखेर पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे. गेल्या ८ वर्षांपासून हा पोलिसांना गुंगारा देत होता.
मनीष अंकुश परब (रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
मालवण पोलीस ठाण्यात १८ सप्टेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने एका महिलेचे एटीएम कार्ड लांबवून तिच्या खात्यातून मोठी रक्कम काढली होती. त्यानंतर ८ वर्ष आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे माग काढून मावळ मधील वराळे येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
तब्बल ८ वर्षानंतर देखील गुन्ह्याचा पाठपुरावा सुरु ठेवत पोलिसांनी केलेल्या नियोजनबद्ध कारवाईमुळे प्रलंबित असलेल्या गुन्ह्याच्या तपासाला दिशा मिळाली आहे.




