ब्रेकिंग न्यूज

पुण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, गांजा विकत घेणारे ४३ जण पोलिसांच्या ताब्यात

Share

पुणे- कोंढव्यात अंमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्सने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थांची विक्री करणार्‍या दोन सराईत गुन्हेगाराला पकडून त्यांच्याकडे अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी आलेल्या ४३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ दुचाकी, तीनचाकी गाड्या, ३५ मोबाईल तसेच २६ हजार ९६० रुपयांचे रोकड आणि ३ किलो गांजा जप्त करण्यात आला.

अजु अहमद शेख (रा. कोंढवा) आणि गणेश सिद्धु पाटोळे (रा. बुद्धविहार सोसायटी, कोंढवा) असे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथकाला कोंढव्यात अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी काकडे वस्तीतील शिवनेरी गल्लीतील दर्ग्याजवळ सापळा रचला. तेथे अज्जू भाई व गणेश पाटोळे हे आले असताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ३ किलो गांजा आढळला. वेशांतर केलेले पोलीस या दोघांबरोबर तेथे उपस्थित होते. आरोपींकडे गांजा विकत घेण्यासाठी अनेकजण त्या ठिकाणी येत होते. त्यांनी गांजाची मागणी केल्यानंतर पोलीस त्याला बाजूला घेत होते. अशा प्रकारे गांजा विकत घेणाऱ्या तब्बल ४३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही कारवाई अंमली पदार्थ टास्क फोर्स महाराष्ट्राच्या पुणे पथकाचे प्रमुख ज्योतिप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त अनुज तारे, पोलीस उपअधीक्षक नंदिनी वग्यानी, तावसकर, पोलीस उपनिरीक्षक आशिष सरवदे, सहायक फौजदार तुपे, पोलीस हवालदार कळसकर, पोलीस अंमलदार ढेभे, साबळे, होळकर यांनी केली.