पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या आवारात पाळीव श्वान आणून अनोखे आंदोलन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि लहान मुले व नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी दि.२० राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीबाहेर श्वान सोबत आणून एक अनोखे आणि आक्रमक आंदोलन केले. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक यश साने, तुषार सहाणे आणि संगीता ताम्हाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
चिंचवड आणि चिखली परिसरात भटक्या श्वानांनी लहान मुलांवर केलेल्या गंभीर हल्ल्यांचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या गंभीर समस्येकडे ढिम्म प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी चक्क जिवंत पाळीव श्वान (कुत्रे) सोबत आणून महापालिका भवनाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
चिखली व चिंचेचा मळा परिसरात लहान चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यामुळे नागरिक व नगरसेवक संतप्त झाले होते. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
शहरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. जर वेळेत ठोस कारवाई झाली नाही, तर पुढील आंदोलनात शहरातील पिसळलेले व भटके कुत्रे थेट महापालिका कार्यालयात आणून सोडले जातील असा प्रशासनाला इशारा देण्यात आला.
