ब्रेकिंग न्यूज

दिशा सालियन केस : सतीश सालियन यांच्या नोटीसला आदित्य ठाकरे यांनी दिले २६ पानी प्रत्युत्तर

Share

मुंबई- दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित सतीश सालियन यांच्या कायदेशीर नोटीसला आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी सतीश सालियन यांच्याकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तथा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आदित्य ठाकरे यांनी १६ सप्टेंबरला ‘एक्स’वर इंग्रजी आणि मराठी भाषेत पोस्ट केली होती. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले होते. तसेच दिशा सालियन सोबत जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. पण आपण दिशा हिला कधीही भेटलो नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.
त्यावर सतीश सालियन यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. तसेच या पोस्टमुळे बदनामी झाल्याचा दावा करत ५०० कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियान हे स्वतः वकिलांच्या टीमसह शनिवारी दुपारी आमदार आदित्य ठाकरे यांना कायदेशीर नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी ‘मातोश्रीच्या गेटबाहेर जोरदार हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सतीश सालियान यांना आत जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. यानंतर आदित्य ठाकरेंना बजावण्यात आलेली ५०० कोटींची अब्रुनुकसानाची नोटीस ठाकरेंच्या वकिलांनी स्वीकारली. नोटीस स्वीकारल्याची पावती सतीश सालियन यांच्या वकिलांना देण्यात आली.

आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी दिले उत्तर

सतीश सालियन यांच्या वकिलांकडून देण्यात आलेल्या नोटीसमधील सर्व आरोप, दावे हे खोटे, चुकीचे आणि कायदेशीररित्या न टिकणारे असल्याचे आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी उत्तरात म्हटले आहे. तसेच नोटीसमध्ये जे स्पष्ट मान्य केलेले नाही ते मान्य केले असे समजू नये, असेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे.