ब्रेकिंग न्यूज

ट्रक-दुचाकीच्या धडकेत वडील-मुलीचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी  

Share

चाकण – औद्योगिक वसाहतीतील शिंदे (ता. खेड) गावाजवळ शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. 

राजेंद्र बंडा भोर (वय-४२) आणि मयुरी राजेंद्र भोर (वय-१५) अशी मृतांची नावे आहेत. तर वैशाली राजेंद्र भोर (वय-३६, तिघे मूळ रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, सध्या रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी साडेचारच्या सुमारास किंगफा कंपनीजवळ घडला. मयूरी तिचा भाऊ मयूर याला राखी बांधण्यासाठी मावळ तालुक्यातील मिंढेवाडी येथे मामाच्या घरी जात होती. मयूर शिक्षणासाठी तिथेच राहतो. मात्र, वाटेतच काळाने घाला घातल्याने भाऊ-बहिणीची ही भेट होऊ शकली नाही.

मृत राजेंद्र हे व्यवसायाने चालक होते तर मृत मयुरी नवव्या इयत्तेत शिकत होती. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास करत आहेत.