तळवडेमध्ये धाडसी दरोडा ; घरात घुसून महिलेचे हात पाय डोळे बांधून सोन्याच्या दागिन्यासह लुटली १२ लाखांची रोकड

पिंपरी- पहाटेच्या सुमारास घरात घुसून ३ ते ४ चोरट्यानी एका महिलेचे हात पाय डोळे बांधून सुमारे ६५ तोळे सोन्याचे दागिने आणि १२ लाखांची रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना तळवडे रुपीनगर येथे पहाटे दीड ते तीनच्या दरम्यान घडली.
भारती मारुती भालेकर असे महिलेचे नाव असून तिच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला घराच्या पहिल्या मजल्यावर एकटीच झोपलेली असताना पहाटेच्या सुमारास ३ ते ४ चोरटे घरात शिरले. त्यांनी महिलेचे डोळे बांधून, चाकूचा धाक दाखवून घरातील सुमारे ६५ तोळे सोन्याचे दागिने आणि १२ लाखांची रोकड लुटून नेली. महिलेने पाठलाग करू नये म्हणून चोरट्यांनी जाण्यापूर्वी तिचे हात पाय बांधून ठेवले.
पीडित महिलेचा मुलगा आणि सून पहिल्या मजल्यावर झोपलेले होते. सकाळी उठून बघितल्यानंतर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासाला सुरुवात केली. हा सर्व प्रकार घरावर पाळत ठेऊन माहिती घेऊन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमधील निवासी परिसरांतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील तपास सूरू आहे.






