शिवाजीनगर न्यायालय घटनेनंतर पुणे पोलिसांची धडक कारवाई ; ६८ अवैध हत्यारासहित ३१ आरोपी जेरबंद

पुणे – शिवाजीनगर कोर्टात घडलेल्या थरारक घटनेनंतर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलीस दल खडबडून जागे झाले आहे. पोलिसांनी संपूर्ण शहरांत ‘कोंबिंग ऑपरेशन’ सुरु केले असून या कारवाईत ६८ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी ६५ गुन्हे दाखल करून ३१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांपासून पुणे शहरांत गुंडगिरी आणि गुन्हेगारी वाढलेली असून गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कमी झालेला दिसून येत आहे. कोयता गॅंग आणि गुंड टोळक्याकंडून शहरात धुडगूस सुरू आहे. त्यात शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाच्या सातही परिमंडळ आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी २६ ते २७ नोव्हेंबरदरम्यान ही विशेष संयुक्त मोहीम राबविली.
या कालावधीत शहरातील ७१ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन, ४२ ठिकाणी नाकाबंदी आणि ९० ठिकाणी पायी गस्त घालण्यात आली. नाकाबंदीदरम्यान एक हजार ३२५ वाहनांची कसून तपासणी करून ३१ जणांवर, तर एका मद्यपी वाहन चालकावर कारवाई करण्यात आली. याशिवाय ३६२ हॉटेल, लॉजेस तसेच संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात आली.
या मोहिमेत गंभीर गुन्ह्यांतील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये खुनाच्या गुन्ह्यातील १५१, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २५५ आणि ‘मकोका’अंतर्गत १८४ आरोपींची झडती घेतली. कारागृहातून सुटलेल्या ५२९ आरोपींची तपासणी करून त्यापैकी आठ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत…..
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सात आरोपींना अटक
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
दारूबंदी व जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये तिघांना अटक







