कचरा नियोजनात पिंपरी पालिका अपयशी ; सुनेत्रा पवार यांची नाराजी

कचरा नियोजनात पिंपरी पालिका अपयशी ; सुनेत्रा पवार यांची नाराजी 
Share

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे सांगत राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून बंद का आहे, मोशी दुर्घटनेनंतर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, मोशी कचरा डेपोची क्षमता संपल्यानंतर पर्यायी जागेचे नियोजन झाले आहे का, असे सवाल त्यांनी प्रशासनाला केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा आणि शहराच्या भविष्यातील गरजांचे नियोजन करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आज, सोमवारी (दि. २३) महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून बंद का आहे, मोशी दुर्घटनेनंतर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, मोशी कचरा डेपोची क्षमता संपल्यानंतर पर्यायी जागेचे नियोजन झाले आहे का, असे सवाल त्यांनी प्रशासनाला केले.

यावेळी त्यांनी मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रकल्पाचे काम सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती घेऊन स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाचे काम प्रलंबित न ठेवता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या.

अजितदादांचे शहर घडवण्याचे स्वप्न पूर्ण करू!

शहराच्या विकासासाठी अजित पवार यांनी दिलेला वेळ, घेतलेले कष्ट आणि दाखवलेली निष्ठा यांची जाणीव प्रत्येकाला आहे. त्यांनी या शहरासाठी जितका वेळ दिला, तितका वेळ कदाचित आपल्या कुटुंबालाही दिला नसेल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

अजित पवार सुरुवातीला या शहरात आले, तेव्हा पिंपरी-चिंचवडची परिस्थिती वेगळी होती. या शहराला सुंदर, नियोजनबद्ध आणि विकसित बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. शहर घडवताना त्यांनी अनेक माणसेही घडवली. त्यांच्या स्वप्नातील या शहरासमोर आज विविध प्रश्न निर्माण होत असल्याचे ऐकून मनाला वेदना होतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री म्हणून अजितदादांप्रमाणेच माझेही या शहरावर प्रेम आहे. महायुती सरकार आणि मी स्वतः पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. शहरातील सर्व विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

मोशी कचरा दुर्घटनेबाबत प्रशासनाला जाब

मोशी येथील कचरा दुर्घटना अत्यंत वेदनादायी होती. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी कचरा नेणे थांबवण्यात आले. मात्र, त्यानंतर शहरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जात आहे आणि त्यासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे, याची माहिती त्यांनी प्रशासनाकडून घेतली.

पिंपरी-चिंचवडला पुन्हा देशातील अग्रगण्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. अजितदादांनी या शहरासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी मी महापालिका प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.

Vedh News