लोणावळा येथील चार पंचतारांकित हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ निलंबित

लोणावळा – येथील चार पंचतारांकित हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी दि ऑर्किड, रिदम, द फर्न आणि बेसिलिका या चार हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. या हॉटेल्सच्या स्वयंपाकघरांमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ, खाद्य रंग, झुरळांचा वावर, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे तसेच अस्वच्छता अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत लोणावळ्यातील प्रमुख हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच स्वच्छतेसंदर्भातील अनुसूची चारमधील नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. दि ऑर्किड हॉटेलच्या स्वयंपाकघरात आणि शीतगृहात दुधाची ११ मुदतबाह्य पाकिटे आढळली.
कच्च्या चिकनमधून रक्तमिश्रित पाणी गळत असल्याचेही निदर्शनास आले. खाद्य रंग आणि अजिनोमोटोचा वापर होत असतानाही मेन्यू कार्डवर त्याचा उल्लेख नव्हता. तर द फर्न हॉटेलमध्ये बेकरी उत्पादनांसाठी मुदतबाह्य खाद्य रंग वापरले जात असल्याचे आढळले. हे रंग नष्ट करण्यात आले असून स्वयंपाकघरात मृत आणि जिवंत झुरळेही आढळली.
या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर एफडीएने चारही हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही, असा इशारा एफडीएचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.






