मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला डेक्कनमधून अटक; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई

पुणे – वारजे पोलीस ठाण्यात मोक्का अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने डेक्कन परिसरातून अटक केली.
मनीष शांताराम गंगावणे (वय ३०, रा. अचानक चौकाजवळ, ओम मित्र मंडळासमोर, वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वारजे पोलीस ठाण्यात मनीष गंगावणे याच्यासह इतर आरोपींविरुद्ध विविध गुन्ह्यांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलम ३ (१) (ii), ३ (४) अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील मनीष गंगावणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
दरम्यान, बुधवारी (दि. १८) गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण आणि पोलीस अंमलदार योगेश झेंडे यांना गोपनीय बातमीदाराकडून मनीष गंगावणे डेक्कन येथील चौपाटी परिसरात आल्याची माहिती मिळाली.
या माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने डेक्कन परिसरात शोध घेतला. शेलारमामा चौकाजवळील बीड अंडा राईस हॉटेलच्या पाठीमागे बसलेल्या मनीष गंगावणे याला पोलिसांनी घेराव घालून त्याला पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाई आणि तपासासाठी त्याला कोथरूड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस हवालदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण, अतुल साठे, विपुल गायकवाड, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे आणि आशिष राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.







