पुणे-नाशिक प्रवास सव्वा तासाने कमी ; नाशिक फाटा–खेड उन्नत मार्गाचे काम २ महिन्यांत सुरु होणार!

पुणे-नाशिक प्रवास सव्वा तासाने कमी ; नाशिक फाटा–खेड उन्नत मार्गाचे काम २ महिन्यांत सुरु होणार! 
Share

चाकण -पुणे नाशिक महामार्गांवर भोसरी, चाकण परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच फुटणार असून नाशिक फाटा ते खेड या आठ पदरी उन्नत मार्गाचे काम येत्या दोन महिन्यांत सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

सध्या पुणे शहरातून भोसरी आणि चाकण औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. प्रस्तावित उन्नत मार्गामुळे पुणे – नाशिकदरम्यान वेगवान, नियंत्रित प्रवेशाची वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे; तसेच शहरातील आणि औद्योगिक पट्ट्यातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या मार्गाने नित्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे ते नाशिक यामधील २१५ किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे चार ते पाच तासांचा अवधी लागतो. मात्र, उन्नत मार्गामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ७५ मिनिटांनी कमी होण्याचा ‘एनएचएआय’चा अंदाज आहे.

या प्रकल्पात आठपदरी उन्नत मार्ग, नऊ प्रमुख जंक्शन आणि दोन मोठ्या पुलांचा समावेश आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूंना सेवा रस्ते, प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी रॅम्प, लहान पूल, भुयारी मार्ग; तसेच पादचारी सुविधांची उभारणी केली जाणार आहे. प्रकल्पासाठी ६० मीटर आणि ४५ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. चाकण जंक्शनसाठीही स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे.

जमीन १०० टक्के ताब्यात आल्यानंतरच निविदेची अंतिम प्रक्रिया करण्याची अट आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने घातली होती. मात्र, जुलै २०२६मध्ये ९३ टक्के जमीन उपलब्ध असल्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्या. उर्वरित भूसंपादन लवकर होण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार अतिरिक्त १४.१ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर सोपविण्यात आली. भूसंपादनासाठी ६०० कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करण्यात आला. प्रकल्पासाठी एकूण १६७.२७ हेक्टर जमीन आवश्यक असून, त्यापैकी १६३.४७ हेक्टर जमीन ताब्यात आली आहे. उर्वरित ३.८ हेक्टर जमिनीचे संपादन प्रलंबित आहे.

 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

– राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वर हा प्रकल्प राबविण्यात येणार

– नाशिक फाटा ते खेडदरम्यानचा २९.९२ किलोमीटरचा मार्ग आठपदरी उन्नत स्वरूपात

या मार्गासाठी दोन स्वतंत्र पॅकेज

– पहिल्या पॅकेजमध्ये १६.७३ किमी काम

– दुसऱ्या पॅकेजमध्ये १३.१८ किमीचे काम

– दोन्ही पॅकेजची बांधकाम मुदत ३६ महिन्यांची प्रस्तावित

 

या प्रकल्पात पुढील घटकांचा समावेश

– आठपदरी उन्नत मार्ग

– नऊ प्रमुख जंक्शन

– दोन मोठे पूल

– दोन्ही बाजूंना सेवा रस्ते

– प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी रॅम्प

Vedh News