भोंदू खरात प्रकरणी रुपाली ठोंबरेंचा आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते आणि रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप

पुणे – नाशिक मधील वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी राज्य महिला आयोगच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आयपीएस अधिकारी आणि खरात प्रकरणाच्या एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या आजवरच्या प्रशासकीय बदल्या केवळ अशोक खरात याच्या मध्यस्थीतूनच झाल्या आहेत. विशेष म्हणजे, स्वतः रुपाली चाकणकर याच याबाबत खुलेपणाने सांगायच्या, असा खळबळजनक दावा रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.
रुपाली ठोंबरे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी स्वतः सातपुते यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली होती. मात्र, सातपुते यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. धक्कादायक बाब म्हणजे, चाकणकर यांच्यावर कोणतीही कारवाई न करता, ज्यांनी त्यांच्यावर उघडपणे टीका केली, त्यांच्यावरच जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले. पुणे शहरात बदली झाल्यानंतर तब्बल सात महिन्यांनी सातपुते यांनी रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरून एक खोटी तक्रार नोंदवली, असा थेट आरोप ठोंबरे यांनी केला आहे.
हा संपूर्ण वाद केवळ एका भोंदू बाबासोबत काढलेल्या छायाचित्रांपुरता मर्यादित राहिलेला नाही. यामध्ये मोठे आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रुपाली चाकणकर या अशोक खरात याच्या एका ट्रस्टवर पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. ठोंबरे यांनी असा घणाघात केला आहे की, चाकणकर, त्यांची बहीण आणि इतर कुटुंबीयांच्या नावे एका पतसंस्थेमधून कोट्यवधी रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. खरात याच्या अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये चाकणकर यांची बहीण अधिकृत वारसदार (नॉमिनी) आहे. इतके भक्कम पुरावे उपलब्ध असतानाही त्यांच्यावर साधा गुन्हाही का नोंदवला गेला नाही, असा थेट सवाल ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय, सत्तेचा प्रचंड गैरवापर केल्याचा ठपकाही चाकणकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महिलांना आणि प्रतिष्ठित राजकीय नेत्यांना अशोक खरात याच्याकडे नेले होते. आता याच राजकीय नेत्यांना, “मला वाचवा, अन्यथा तुमचे सर्व फोटो व्हायरल करेन,” अशा प्रकारच्या धमक्या त्यांच्याकडून दिल्या जात असल्याचा दावा ठोंबरे यांनी केला आहे. खेमनार नावाच्या एका पत्रकारालाही त्यांनी सक्तीने माफी मागायला लावली होती. प्रशासनाला हाताशी धरून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे हे एक मोठे षडयंत्र असल्याचे रुपाली ठोंबरे यांनी स्पष्ट केले.







