पिंपरी-चिंचवडकरांना मार्चपासून भामा-आसखेडचे १६७ एमएलडी पाणी मिळणार

पिंपरी – मागील सात वर्षांपासून पाणी कपातीचा सामना करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांना नव्या वर्षात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भामा आसखेड धरणातून शहराला अतिरिक्त १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मार्च २०२७ मध्ये उपलब्ध होणार आहे. या योजनेचे काम जानेवारीअखेर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पाण्याची चाचणी घेऊन मार्चपासून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्याचबरोबर पाण्याची मागणीही वाढत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. पाणी कपातीमुळे नागरिकांची गैरसोय होत असून, नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठा आणि वाढती मागणी यांचा ताळमेळ घालताना महापालिका प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा आणि त्यातच दहा टक्के कपात यामुळे नागरिकांच्या अडचणींत भर पडली आहे.
या योजनेचे काम जानेवारी २०२७ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले असून, नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यापासून शहराला अतिरिक्त पाणी मिळेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेअंतर्गत बंदिस्त जलवाहिनीद्वारे १६७ एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येणार आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर शहराच्या एकूण पाणीपुरवठ्यात वाढ होऊन सध्याच्या व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
सध्या दहा टक्के पाणी कपातीनंतर शहराला पवना धरणातून ५२० एमएलडी, आंद्रा धरणातून ९० एमएलडी आणि एमआयडीसीकडून २५ एमएलडी असे एकूण ६३५ एमएलडी पाणी मिळत आहे. त्यात भामा आसखेडचे १६७ एमएलडी पाणी उपलब्ध झाल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळणार आहे.






