पिंपरी-चिंचवड भाजप शहर मध्यवर्ती कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन

पिंपरी-चिंचवड भाजप शहर मध्यवर्ती कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन
Share

पिंपरी- मोरवाडी येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या भाजपाच्या अत्याधुनिक शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. १५) रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालय हे केवळ पक्षाच्या संघटनात्मक कामकाजापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणारे आणि जनसेवेचे प्रभावी केंद्र ठरेल, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने या कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. पक्षाचे संघटन अधिक सक्षम करणे, कार्यकर्त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय मिळवून देणे, हा या नूतनीकरणामागील मुख्य उद्देश आहे.

रवींद्र चव्हाण म्हणाले, “भाजपाची खरी ताकद कार्यकर्त्यांच्या समर्पणात आणि जनतेच्या विश्वासात आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे कार्यालय सत्तेचे नव्हे, तर सेवेचे केंद्र बनले पाहिजे ” या कार्यालयातून नागरिकांना सकारात्मक प्रतिसाद, योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी पाठपुरावा मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच संघटनात्मक शिस्त, जनसंपर्क आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीवर त्यांनी भर दिला.

यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक कार्यकर्ता हा भाजपाच्या संघटनेचा कणा आहे. कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामकाजासाठी सक्षम व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, त्या प्रभावीपणे सोडवणे यासाठी हे कार्यालय आधुनिक आणि सुसज्ज करण्यात आले आहे. हे कार्यालय केवळ विटा-सिमेंटची वास्तू नसून प्रत्येक कार्यकर्त्याच्या ऊर्जेचे आणि जनसेवेचे व्यासपीठ असेल. प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण मिळून पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा भगवा अधिक ताकदीने फडकवू असा विश्वास शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला.

Vedh News