स्ट्रेचरवरून राडारोडा नेणे ठेकेदाराला पडले महागात, भवन विभागाकडून २५ हजारांचा दंड

पुणे – पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामादरम्यान निर्माण झालेला राडारोडा स्ट्रेचरवरून वाहून नेला जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन भवन विभागाने ठेकेदाराला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे आणि आधुनिकीकरणाचे काम तेजदर्शन इन्फ्रा प्रा. लि. या ठेकेदाराकडून सुरू आहे. यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. गेल्या आठवड्यात येथे सुरू असलेल्या बांधकामातून निर्माण झालेल्या राडारोड्याची रुग्णालयातील स्ट्रेचरवरून वाहतूक केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
या रुग्णालयात रुग्णांना स्ट्रेचर मिळत नसताना राडारोड्याच्या वाहतुकीसाठी त्याचा वापर केला जात असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकाराची दखल घेत भवन विभागाने ठेकेदाराकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढे रुग्णालयातील साहित्याचा अशा प्रकारे गैरवापर झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबीही दिल्याचे भवन विभागाचे प्रमुख बिपीन शिंदे यांनी सांगितले.






