बडतर्फी आणि शिक्षेच्या विरोधात आता पोलिसाला एकदाच अपील करता येणार, त्यानंतर थेट……

बडतर्फी आणि शिक्षेच्या विरोधात आता पोलिसाला एकदाच अपील करता येणार, त्यानंतर थेट……
Share

मुंबई – महाराष्ट्र पोलीस दलातील नवीन नियमांनुसार, पोलीस निरीक्षक किंवा त्याखालील कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केल्यास किंवा इतर शिक्षा झाल्यास, त्यांना वरिष्ठांकडे केवळ एकदाच अपील करता येईल. अपील फेटाळल्यास संबंधित पोलिसाला थेट महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (मॅट)कडे जावे लागेल. याबाबत महाराष्ट्र पोलीस दलाने परिपत्रक जारी केले आहे. 

यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील फेटाळल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी अन्य उच्चाधिकारी किंवा थेट गृहमंत्रालयाकडे वारंवार अपील करत असत, ज्यामुळे हजारो प्रकरणे प्रलंबित राहत होती. त्यामुळे राजकीय वजन वापरून अपील मंजूर करून घेतली जात होती.

पोलीस निरीक्षक किंवा त्या खालील पोलिसांना महाराष्ट्र पोलीस (शिक्षा व अपील) १९५६ अन्वये नियमावली लागू आहे. सेवेतून बडतर्फ केल्यास किंवा चुकीबद्दल शिक्षा दिल्यास त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करण्याची संधी असते. परंतु ते अपील फेटाळल्यास अन्य वरिष्ठ अधिकाऱ्याकडे किंवा थेट गृह मंत्रालयाकडे अपील करता येऊ शकते. मात्र त्यामुळे अपीलची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे.

आता वरिष्ठांकडे एकदा अपील करून ते फेटाळल्यास, संबंधित पोलिसास त्यानंतर थेट महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाद मागावी लागेल. त्याप्रमाणे मुंबई पोलीस कायद्यात देखील त्यानुसार सुधारणा करण्यात येणार असल्याचे गृह मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले आहे.

Vedh News