गावागावांत जाऊन काम करा कधीतरी तुमचा नंबर लागेल, अमित शाह यांचा राहुल गांधी यांना सल्ला

गावागावांत जाऊन काम करा कधीतरी तुमचा नंबर लागेल, अमित शाह यांचा राहुल गांधी यांना सल्ला
Share

तळेगाव दाभाडे- सततच्या निवडणूक पराभवामुळे काँग्रेसमध्ये नैराश्य निर्माण झाले असून, या नैराश्यातूनच काँग्रेस नेते राहुल गांधी भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करत आहेत. देशाची बदनामी करण्याचे काम असेच सुरू ठेवले, तर पुढील ३० वर्षे तरी काँग्रेसला सत्तेची संधी मिळणार नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

तळेगाव दाभाडे येथे नॅशनल हेवी इंजीनियरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णकुमार गुर्जर, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

अमित शाह म्हणाले, ” देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 70 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. काँग्रेसच्या कार्यकाळात शेतकरी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची मागणी करत होते. मात्र त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही ” भाजप सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून ही मागणी पूर्ण केल्याचे शाह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात नरेंद्र मोदी यांच्यावर चार आण्याच्या भ्रष्टाचाराचाही आरोप झालेला नाही, असे शहा यांनी सांगितले. देशाच्या नेतृत्वाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्याचे काम पंतप्रधान मोदी करत असताना काँग्रेसचे नेते मात्र परदेशात जाऊन भारत आणि पंतप्रधानांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी परदेश दौरे करण्यापेक्षा देशातील सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी गावागावांत जावे. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून जनतेमध्ये काम करावे, असा सल्ला शहा यांनी दिला. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाची आणि पंतप्रधानांची बदनामी करण्याऐवजी देशातील जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जनतेमध्ये काम करा, तर कधीतरी तुमचा नंबर लागू शकतो. मात्र, राहुल गांधी हे आपली भूमिका बदलणार नाहीत आणि त्यांचे परदेश दौरे सुरूच राहतील, अशी टीकाही त्यांनी केली.

Vedh News