आळंदीमध्ये पूर्ववैमनस्यातून भरदिवसा तरुणावर कोयत्याने हल्ला

आळंदी- येथील नगर परिषद परिसरात एका तरुणावर धारदार कोयता आणि चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना शुक्रवारी (दि. १३) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सागर दत्तात्रय बडे (रा. अण्णाभाऊ साठे नगर, काटे कॉलनी, देहू फाटा, दिघी) असे या तरुणाचे नाव असून तो रिक्षाचालक आहे. पोलिसांनी आर्यन नागोराव पंडित (रा. कोळगाव) आणि त्याच्या इतर दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बडे हा आपल्या नेहमीच्या कामानिमित्त आळंदी परिसरामध्ये आला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेले जुने भांडण आणि त्याचा राग मनात धरून आरोपींनी शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आळंदीतील वर्दळीच्या पीसीएमटी चौकामध्ये हातामध्ये धारदार शस्त्रे आणि खंजीर घेऊन सागर बडे याचा पाठलाग करून त्याच्यावर कोयता आणि चॉपरने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सागर बडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके व त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर फरार झालेला मुख्य आरोपी आर्यन पंडित व त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.






