सराफा व्यावसायिकाचे लाखोंचे दागिने, रोकड घेऊन पसार झालेल्या चौघांना अटक

पुणे – सराफा व्यावसायिकाने कामानिमित्त दिलेली २८ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या कामगारासह त्याच्या तीन साथीदारांना खडक पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. आरोपींकडून २६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशाल सत्यपाल चौहान (वय-२०), विकासकुमार रामबीरसिंग जाधोन (वय-२९), बिनेश सत्यपालसिंग चौहान (वय-२७, तिघे रा. मिसाकल, जि. एटा, उत्तर प्रदेश) आणि बृजेश सुरेंद्रसिंग चौहान (वय-१९, रा. विजयनगर नरदोली, जि. कासगंज, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
३० ऑक्टोबर २०२६ रोजी कुरिअर कंपनीच्या माध्यमातून मुंबईला पाठवण्यात येणाऱ्या ऐवजाची जबाबदारी विशाल सत्यपाल चौहान याच्याकडे होती. विशाल याच्याकडे २८ लाख रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग मुंबईतील कार्यालयात पोहोचविण्यासाठी दिली होती. मात्र, विशालने ती बॅग मुंबईत न पोहोचवता मध्येच उतरून पोबारा केला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे आढळले. विशालने आपल्या भावासह मित्र आणि मेहुण्याच्या मदतीने हा कट रचल्याचे तपासात समोर आले. त्याचा भाऊ बिनेश सत्यपालसिंग चौहान, मित्र विकास कुमार जाधोन आणि राधेश्याम ऊर्फ पिकू चौहान, तसेच मेहुणा ब्रिजेश सुरेंद्रसिंह चौहान यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले. मात्र, तांत्रिक तपास आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. यासाठी पथकाने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तब्बल २५ दिवस शोधमोहीम राबवली. या काळात पोलिसांनी १० हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास केला, तर आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तीन वेळा उत्तर प्रदेशात जावे लागले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्या तपास पथकातील सहाय्यक निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस कर्मचारी विनोद शिंदे, हेमंत पेरणे, मयूर भोसले, सैफ नदाफ, नीलेश साबळे, विकास पांडुळे यांनी उत्तर प्रदेश, नोएडा आणि डेहराडून येथे आरोपींचा शोध घेतला. सुमारे २५ दिवस दहा हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केल्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशातील एटा, कासगंज जिल्ह्यांत लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींची चौकशी आणि त्यांच्या घरांची झडती घेतल्यानंतर पोलिसांच्या हाती अखेर ऐवज लागला. विकास जाधोन याच्या घरातून 120 ग्रॅम वजनाची सोन्याची दोन बिस्किटे जप्त करण्यात आली. त्यांची किंमत १६.८० लाख रुपये आहे. तर ब्रिजेश चौहान याच्या घरातून ७ लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी आणि चांदीची साखळी हस्तगत करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण २६.३३ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.






