‘आईबरोबरचे प्रेमसंबंध संपव…’ असे बजावून सुद्धा ऐकले नाही…अखेर मुलाने काटा काढला ; अहिल्यानगर हादरले

अहिल्यानगर- आईशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून मुलाने ४० वर्षीय इसमाची भरवस्तीत सकाळी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ही थरारक घटना नेवासा तालुक्यातील सोनई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात, शिंगणापूर कमानीजवळ काल शुक्रवारी (दि. १३) सकाळी घडली. या घटनेने सोनई गाव हादरले आहे.
रावसाहेब मच्छिंद्र पंडित (वय ४०) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. घटनेनंतर पसार झालेल्या मुख्य आरोपीला सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, रावसाहेब पंडित हे मालवाहतूक वाहन चालवून शेतमजुरांची ने-आण करण्याचं काम करत होते. या कामादरम्यान त्यांची गावातील एका महिलेशी ओळख झाली. पुढे या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधांत झाले. या संबंधांची कुणकुण महिलेच्या मुलाला लागताच घरात वाद सुरु झाले. आपल्या आईशी संबंध ठेवू नये म्हणून मुलाने रावसाहेब यांना वारंवार समज दिली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून संबंध सुरूच राहिल्याने मुलाच्या मनात संताप वाढत गेला.
काल शुक्रवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास रावसाहेब पंडित हे आंबेडकर चौकात आपल्या वाहनाजवळ उभे होते. याचवेळी महिलेचा मुलगा आणि त्याचा एक साथीदार दुचाकीवरून तेथे आले. काही क्षणातच त्यांनी रावसाहेब यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. भरचौकात अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. हल्ला करून दोघेही जण घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलतभाऊ कैलास मंजाबापू पंडित यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रावसाहेब यांना तातडीने सोनई येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.






