येरवडा परिसरात तरुणावर लोखंडी फायटर, दगडांनी टोळक्याचा जीवघेणा हल्ला

पुणे- एका तरुणावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने लोखंडी फायटर आणि दगडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरज कांबळे (वय २५) असे या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सूरजवर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास येरवडा येथील लक्ष्मीनगर परिसरात ही घटना घडली. जखमी तरुण सूरज कांबळे हा परिसरात असताना काही जणांसोबत त्याचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, हल्लेखोरांनी अचानक सूरजवर लोखंडी फायटर आणि दगडांनी अत्यंत निर्घृणपणे हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सूरजसोबत असलेल्या इतर तरुणांनीही समोरील टोळीवर पलटवार करत बचाव करण्याचा प्रयत्न केला.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सूरज जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांना तब्बल ६ टाके घालावे लागले आहेत. भीषण या जीवघेण्या हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुख्य आरोपीची आई आणि चुलती पुणे पोलीस दलातच कार्यरत असल्याचा खळबळजनक दावा तक्रारदार सूरज कांबळे याने केला आहे. पोलीस नातेवाईकांच्या राजकीय व प्रशासकीय दबावाखाली येऊन पोलिसांनी उलट आपल्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप सूरजने केला आहे.
पोलीस ठाण्यात योग्य न्याय मिळत नसल्याचा आरोप करत पीडित सूरज कांबळे याने थेट पुणे पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली आहे. मारहाणीचे स्पष्ट सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय कागदपत्रांच्या पुराव्यांसह त्याने पोलीस आयुक्तांकडे अधिकृत तक्रार सादर केली आहे. या प्रकरणात पोलिसांचा कोणताही राजकीय किंवा अंतर्गत दबाव न आणता निष्पक्ष तपास व्हावा, आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी आणि स्वतःच्या जिवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, अशी आक्रमक मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे.






