लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवघरातून ६४ लाखांचा ऐवज लंपास ; पुण्याच्या विविध भागातून चोरट्यांचा डल्ला

पुणे- लक्ष्मीपूजनाच्या रात्री चोरट्यांनी हडपसर, कात्रज, बिबवेवाडी आणि कोंढवा यांसारख्या विविध भागांतील घरांच्या देवघरांमधून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ६४ लाखांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
हडपसर मधील नेताजी सुभाष गृहरचना सोसायटीमध्ये अण्णासाहेब मगर महाविद्यालयासमोर असलेल्या बंगल्यात लक्ष्मीपूजन आटोपून कुटुंब झोपले असताना, मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी तळमजल्यावरील देवघराच्या खिडकीची काच काढून घरात प्रवेश केला. देवघरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि १२ लाखांच्या रोख रकमेसह तब्बल ४८ लाखांचा ऐवज लांबवला.
या प्रकरणी वर्षीय अजित रामचंद्र वाडेकर (वय ४९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभम शिंदे तपास करीत आहेत.
कात्रज भागातील संतोषनगर मध्ये एका सोसायटीमधील घरातून एक लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवघरात दहा हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने देवघरात ठेवले होते. सोमवारी दि. ९ फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्यानी घरात प्रवेश करून सर्व ऐवज घेऊन पलायन केले.
बिबवेवाडी सुखसागर नगर भागात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवघरात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड असा ३ लाख २८ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुर्वे तपास करत आहेत.






