मुंबईत तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सहा महिन्यापूर्वी मोठ्या भावाला संपवले आता धाकट्या भावाची देखील केली हत्या

मुंबईत तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सहा महिन्यापूर्वी मोठ्या भावाला संपवले आता धाकट्या भावाची देखील केली हत्या
Share

मुंबई- मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये एका तरुणाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ज्या तरुणाची गोळीबार करून हत्या करण्यात आली त्याच्याच भावाची सहा महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कुर्ला परिसरातील माकडवाला कम्पाउंड परिसरात ही घटना घडली.

विनोद पवार (वय ४०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. विनोद हा कुर्ला पश्चिम भागात असलेल्या शौचालयाजवळ उभा होता, त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या २ तरुणांनी भरदिवसा विनोद पवार याच्यावर बेछुट गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत विनोद यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या भागामध्ये पवार कुटुंबीय राहते. पवार कुटुंबांमध्ये दोन गट असून त्यांच्यामध्ये मागील काही वर्षांपासून वाद सुरू आहे. याच वादातून आता विनोद पवार याची हत्या झाली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करून ठिय्या आंदोलन केले. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वीच १ मे २०२६ रोजी विनोदचा भाऊ बाबा पवार याची तीन जणांनी आधी गोळ्या झाडून आणि नंतर चाकूने वार करून हत्या केली होती. या प्रकरणी शुभम घाडगे, दिनेश पवार आणि अभिजीत जाधव असे तीन आरोपी होते. बाबा पवार हा लोकांना व्याजाने पैसे द्यायचा. त्याने आरोपीच्या आईला व्याजाने पैसे दिले होते. या महिलेसोबत बाबा पवार याचे प्रेमसंबंध होते, अशीही माहिती समोर आली. यातून वाद झाला होता. याच वादातून महिलेच्या मुलाने दोन जणांना सोबत घेऊन बाबा पवारची हत्या केली. एकाच वर्षात एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे

Vedh News