रहाटणी येथे साई मेरीगोल्ड सोसायटीमध्ये सातव्या मजल्यावरील फ्लॅटला आग, सिलेंडरचा स्फोट

पिंपरी- रहाटणी येथील साई मेरीगोल्ड सोसायटीमध्ये सातव्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना सोमवारी (दि.९) घडली. सुरुवातीला बाल्कनीतून लागलेली ही आग झपाट्याने घरातील इन्व्हर्टर बॅटरीपर्यंत पसरली आणि त्यानंतर गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला.
आगीची ठिणगी बाल्कनीतून पडली आणि ती घरातील इन्व्हर्टर बॅटरी, एसी (AC) कॉम्प्रेसर आणि टीव्हीपर्यंत पोहोचली. आगीची तीव्रता वाढल्यामुळे घरातील घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.
घटनेची माहिती मिळताच रहाटणी उप-अग्निशमन केंद्र, नेहरूनगर आणि मुख्य अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक नागरिकांनी इमारतीतील सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, या आगीत घरातील इन्व्हर्टर बॅटरी, एसी, टीव्ही, इलेक्ट्रिक वायरिंग आणि इतर गृहोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
नगरसेवक नाना काटे, युवानेते उमेश काटे आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीमधील अनेक नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केली. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.






