‘शॉर्टकट’ने घेतला तरुणाचा जीव ; प्लस व्हॅलीमध्ये पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे- पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मौजे निवे येथील प्रसिद्ध प्लस व्हॅली परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा २०० फूट दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मिल्कीबार वॉटर फॉल पाहून परत येत असताना शॉर्टकटचा मार्ग निवडणे त्याच्या जीवावर बेतले.
शाहिद अन्सारी (वय २० मूळ रा. बिहार, सध्या ताथवडे ) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
शाहिद अन्सारी हा आपल्या चार मित्रांसोबत प्लस व्हॅली परिसरातील ‘मिल्कीबार धबधबा’ पाहण्यासाठी गेला होता. धबधबा पाहून परतत असताना या तरुणांनी नेहमीच्या वाटेऐवजी डोंगराच्या तीव्र उतारावरून अंदाजे ४५ अंशाचा कोन असणाऱ्या डोंगरवाटेवरून जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला. हा ‘शॉर्टकट’ त्याच्या जीवावर बेतला. दरीची खोली मोठी असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, रोहा रेस्क्यू टीम आणि SVRSS च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसर अत्यंत दुर्गम आणि कठीण असल्याने मृतदेह बाहेर काढण्याच्या मोहिमेला काहीसा विलंब झाला, मात्र बचाव पथकांनी यशस्वीरीत्या मृतदेह दरीतून बाहेर काढला.
या घटनेनंतर पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांनी पर्यटकांना सतर्कतेचे आवाहन केले असून, डोंगराळ भागात फिरताना कोणताही अनोळखी मार्ग किंवा शॉर्टकट न निवडता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे असे म्हटले आहे.






