पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष ; पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांचा कडक इशारा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी पालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्तीचे तंतोतंत पालन करण्याचा कडक इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा कामात कसूर केल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने विभागप्रमुखांवर सामान्य प्रशासन विभागाने करावे करावी असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
अनेकदा पालिकेचे कर्मचारी, अधिकारी कामाच्या वेळेत कार्यालयात उपस्थित न राहता उपाहारगृहात, महापालिकेच्या आवारात इतरत्र हिंडत असतात. ओळखपत्र, गणवेश परिधान न करणारे अनेक कर्मचारी आढळून येतात. बऱ्याचदा वैयक्तिक कामासाठी बाहेर गेलेले आढळून येतात. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडल्यामुळे तक्रारी वाढत आहेत. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी पुस्तके तपासून त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करावी असे आदेश विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.
सातत्याने उशिरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल दरमहा १५ तारखेपर्यंत सामान्य प्रशासन विभागास सादर करावा असेही आदेशात म्हटले आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या नस्तीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट मत नोंदवावे, सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने विभागीय चौकशी प्रस्तावित करावी. ज्या विभागात मानधन, ठेकेदारी कर्मचारी, मदतनीस आहेत, त्यांच्यासाठी विभागप्रमुखांनी हजेरीपत्रक ठेवून त्यावर स्वाक्षरी घ्यावी असे आदेश आयुक्तांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.






