आई-मुलाची इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या ; थेरगाव वाकड परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमधील घटना

पिंपरी- थेरगाव वाकड परिसरातील सिग्नेचर पार्क या उच्चभ्रू सोसायटीमधील १८ व्या मजल्यावरून इमारतीच्या डक्टमध्ये आईने ६ वर्षाच्या छोट्या मुलासहित उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.३०) रोजी संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास घडली.
आई एकता भांगड (३३), मुलगा माधव भांगड (६) असे आत्महत्या केलेल्या माय लेकराचे नाव आहे. ही घटना सायंकाळच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून आई- मुलाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचण किंवा नैराश्य (Depression) यांसारख्या कारणांमुळे हे टोकाचे पाऊल उचलले गेले का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. भांगड कुटुंब राजस्थानचे असून घरात तीनच व्यक्ती राहता. पती आयटी कंपनीत काम करत आहे. एकता भांगड या पती मनोज भांगड आणि मुलगा माधव यांच्यासोबत मागील काही वर्षांपासून या सोसायटीमध्ये वास्तव्यास होत्या.






