तिकीट विचारले म्हणून टीसीवर प्रवाशाचा हल्ला; लोणावळा रेल्वे स्थानकावरील प्रकार

लोणावळा – रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावत असलेल्या तिकीट तपासनिसाला (TC) एका मुजोर प्रवाशाने तिकीट विचारले म्हणून मारहाण केली. प्लॅटफॉर्मवर भरदिवसा घडलेल्या या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, लोणावळा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणीची मोहीम सुरू होती. याचदरम्यान एका प्रवाशाची तिकीट तपासणी करत असताना टीसी आणि त्या प्रवाशामध्ये कोणत्या तरी कारणावरून खटके उडाले. सुरुवातीला दोघांमध्ये केवळ शाब्दिक वाद आणि बाचाबाची सुरू होती. मात्र, काही क्षणांतच संतप्त झालेल्या प्रवाशाने टीसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्लॅटफॉर्मवर घडणाऱ्या या थेट मारहाणीमुळे लोकलची वाट पाहत असलेल्या इतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सरकारी कर्तव्य बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हल्ला झाल्याने रेल्वे प्रशासनात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तिकीट न काढल्याचा दंड भरण्यावरून की अन्य कोणत्या कारणावरून हा वाद उफाळून आला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
या घटनेची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्या प्रवाशाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.






