पुणे शिक्षक मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी

पुणे- पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी अटीतटीच्या लढतीत दणदणीत विजय मिळवला आहे. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीनंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असून आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी राहिली आहे. कौस्तुभ गावडे यांना २३ हजार २०० मते मिळाली आहेत.
या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप यांनी कौस्तुभ गावडे यांना तगडे आव्हान दिले, मात्र शेवटी त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना मतमोजणीच्या प्रक्रियेतून बाद घोषित करण्यात आले. आसगावकर यांना एकूण ८,९६५ मते मिळाली, तर माजी आमदार दत्तात्रय सावंत हेदेखील या शर्यतीतून बाद झाले.
गेल्या ३० तासांपासून राज्याच्या विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. राज्यातील पाचही जागांवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत आहे. काही जागांवर चुरशीची लढाई सुरू असल्याचे चित्र आहे. या चुरशीच्या निवडणुकीत पुणे शिक्षक मतदारसंघाचा अंतिम निकाल जाहीर झाला यामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत.
पराभवानंतर प्रतिक्रिया देताना सचिन सानप म्हणाले, “ही लढत मुख्यत्वे भाजप आणि माझ्यातच होती. शिक्षकांचा आमदार हा प्रत्यक्ष शिक्षकच असावा, यासाठी आम्ही हा लढा उभारला होता. जयंत आसगावकर हे विद्यमान तर दत्तात्रय सावंत हे माजी आमदार होते; प्रत्येकाने आपापल्या परीने ताकद लावली होती. त्यामुळे कोणाचा फटका कोणाला बसला असे म्हणता येणार नाही. येणाऱ्या काळात शिक्षक नक्कीच जागृत होतील आणि या लढ्यात सामील होतील.”






