पुण्यात नववीतील मुलीवर अल्पवयीन मुलाचा वर्गातच चाकू हल्ला, इंस्टाग्रामवरील रील ठरले कारण

पुण्यात नववीतील मुलीवर अल्पवयीन मुलाचा वर्गातच चाकू हल्ला, इंस्टाग्रामवरील रील ठरले कारण
Share

पुणे- येथील बाणेर-बालेवाडी (म्हाळुंगे-सूस) परिसरातील विबग्योर हायस्कूलमध्ये शुक्रवारी (दि. २३) दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील एका विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाळेच्या सहलीमध्ये विद्यार्थिनींचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बावधन पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बावधन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी याबाबत माहिती दिली. महाळुंगे गावात ‘विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल’ ही शाळा आहे. या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांची १७ आणि १८ ऑक्टोबरला पाचगणी, महाबळेश्वर येथे सहल गेली होती. या ठिकाणी कार्यक्रमात मुली डान्स करतानाचा व्हिडिओ मुलाने त्याच्या इन्स्टाग्रामवर टाकला. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आणि शिक्षकांच्या हस्तक्षेपानंतर मुलाला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला होता.

त्याचा राग मनात धरून या विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास वर्गामध्येच त्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आणि छातीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. जखमी विद्यार्थिनीचा जबाब नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सुरक्षेच्या कारणास्तव विद्यार्थ्याला येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात (बालसुधारगृह) ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

‘आरोपी मुलगा आणि जखमी मुलगी एकाच शाळेत शिकत आहेत. दोघेही नववीत असले, तरी त्यांचे बोर्ड वेगळे आहेत. दोघेही एकमेकांना ओळखत नाहीत. मुलाला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,’ असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, घडला प्रकार हा उच्चभ्रू शाळेतील असून जखमी मुलीच्या घरचे उच्च शिक्षित आहेत. दुसरीकडे हल्ला करणाऱ्या मुलाचे आई-वडील देखील उच्चशिक्षित असून वडील मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. आपला मुलगा असं काही टोकाचं पाऊल उचलेल, यावर त्यांचा विश्वासच बसत नाही, असे त्यांच म्हणणं आहे.

दरम्यान, ‘शाळेत आज घडलेली घटना दुर्दैवी आहे. पोलिसांना घटनेची माहिती दिली असून, आम्ही चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहोत. शाळेने या प्रकारास जबाबदार असणाऱ्या विद्यार्थ्यास शाळेतून काढून टाकले आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारीच्या उपायांसोबतच, सर्व वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तरांची काटेकोर तपासणी सुरू करण्यात येत आहे,’ असे शाळा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Vedh News