भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, शंकर महाराजांचे दर्शन घेऊन परत येत असताना झाला अपघात

पुणे- सातारा रस्त्यावर शंकर महाराज मंदिरात दर्शन घेऊन दुचाकीवरून परतणाऱ्या तरुणाला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री पुण्यातील बालाजीनगर परिसरात घडली.
मयूर मनीष होनकळसे (वय २६, रा. बालाजीनगर, मूळ रा. सातारा) या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टेम्पोचालक विवेकानंद भगत (वय २३, रा. चाकण) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर हा शंकर महाराज मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपल्यानंतर तो दुचाकीवरून निघाला असता भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने मयूरचा मृत्यू झाला. सहकारनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.






