‘रुग्णांना औषधासाठी दुसऱ्या मेडिकल स्टोअरमध्ये का पाठवता ?’ ; रहाटणीत डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण

‘रुग्णांना औषधासाठी दुसऱ्या मेडिकल स्टोअरमध्ये का पाठवता ?’ ; रहाटणीत डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण
Share

पिंपरी- रुग्णांना औषधासाठी दुसऱ्या मेडिकल स्टोअरमध्ये का पाठवता, अशी विचारणा करून रहाटणी येथील एका क्लिनिकमध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना सोमवारी (दि. १९) ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी एकच्या सुमारास रहाटणी येथील लक्ष्मीभक्ती हाउसिंग सोसायटीसमोरील, शिवाजी पुतळ्याजवळ असलेल्या श्री महावीर क्लिनिकमध्ये घडली. या प्रकरणी डॉ. संदीप वसंतलाल लुनावत (वय ५८) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लिनिकच्या शेजारी असलेल्या गुरुकृपा मेडिकलचे चालक ओंकार सुनील पाटील हे क्लिनिकमध्ये आले. रुग्णांना औषधांची चिठ्ठी देऊन आमच्या मेडिकलमध्ये न पाठवता दुसऱ्या मेडिकलमध्ये का पाठवता ? असा जाब विचारत त्यांनी आरडाओरडा केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांची आई संगीता पाटील यांनी क्लिनिकमधील महिला कर्मचारी लता कोलते यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

डॉक्टरांची मुलगी श्वेता ही भांडण सोडविण्यासाठी पुढे आली असता तिलाही शिवीगाळ करून ढकलून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीची बहीण, तिचा पती आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती क्लिनिकमध्ये आल्या. त्यांनी डॉक्टरांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात विविध कलमांसह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम २०१० च्या कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळेगावे करीत आहेत.

Vedh News