‘मी देवा जमादार आहे, ओळखत नाही का?’ पिस्तूल रोखून धमकी; मोशीतील पेट्रोल पंपावर ऑईलच्या सवलतीवरून वाद

पिंपरी- इंजिन ऑईलवर सवलत न दिल्याच्या रागातून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मोशीतील वाघजाई पेट्रोल पंपावर रविवारी (दि. १८) मध्यरात्री सुमारे १२.०५ वाजता घडला. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
देवानंद ऊर्फ देवा जमादार, सुलतान इसुफ खान, विलास धाऊ ढेबे आणि काशिनाथ कल्याण काळे अशी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. कुणाल साहेबराव रणवीर याचाही आरोपी म्हणून उल्लेख आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवन राजाराम पांढरे (वय ३३) हे पेट्रोल पंपावर काम करत असताना पांढऱ्या स्विफ्ट कारमधून (एमएच १२ क्यूडब्ल्यू ०२८९) काही जण आले. त्यांच्यापैकी दोघांनी इंजिन ऑईलची किंमत विचारली. मॅक कंपनीच्या ऑईलची किंमत ३६९ रुपये प्रति लिटर सांगण्यात आली. सुरुवातीला ऑईल घेण्यास नकार दिल्यानंतर ते पुन्हा आले आणि त्यांनी एक लिटर ऑईल खरेदी केले.
ऑईल घेतल्यानंतर त्यांनी सवलत मागितली. सवलत मिळणार नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितल्यावर त्यांनी यूपीआय स्कॅनरद्वारे ३६९ रुपयांचे पेमेंट केले. मात्र, सवलत न मिळाल्याने आरोपीने कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधिताने ‘तुला पाहतोच आता… मी देवा जमादार आहे, मला ओळखत नाही का? मी तुला मारूनच टाकतो,’ अशी धमकी दिली. त्यानंतर कमरेला लावलेले पिस्तूल काढून कर्मचाऱ्याच्या दिशेने रोखले. या प्रकारामुळे पेट्रोल पंपावर दहशत पसरली व ग्राहक पळून गेले.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






