विहिरीचे खोदकाम करताना मातीची दडी कोसळून दोघांचा जागीच मृत्यू ; बारामती तालुक्यातील दुर्घटना

विहिरीचे खोदकाम करताना मातीची दडी कोसळून दोघांचा जागीच मृत्यू ; बारामती तालुक्यातील दुर्घटना
Share

बारामती- पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथे विहिरीच्या खोदकामावेळी भीषण दुर्घटना घडली. अचानक मातीची दडी कोसळून त्याखाली दबले जाऊन दोन व्यक्तींचा मृत्यू झाला.

अमोल धनाजी रसाळ आणि मच्छिंद्र रामचंद्र रसाळ अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव रसाळ येथे विहिरीच्या खोदकामाचे काम सुरू होते. यावेळी विहिरीच्या बाजूची माती अचानक ढासळली. मातीचा मोठा ढिगारा थेट खोदकाम करणाऱ्या मजुरांवर कोसळल्याने ते त्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत अमोल धनाजी रसाळ आणि मच्छिंद्र रामचंद्र रसाळ हे गंभीररीत्या मातीखाली अडकले. मात्र, या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन जणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विहिरीच्या खोदकामावेळी माती नेमकी कशामुळे ढासळली, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. या दुर्घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Vedh News