मद्यधुंद मालकाने आपल्याच पाळीव श्वानाला थेट चौथ्या मजल्यावरून फेकले, पुण्यातील घटना

मद्यधुंद मालकाने आपल्याच पाळीव श्वानाला थेट चौथ्या मजल्यावरून फेकले, पुण्यातील घटना
Share

पुणे – दारूच्या नशेमध्ये धुंद असलेल्या इसमाने स्वतःच्याच पाळीव कुत्र्याला बेदम मारहाण करून चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. ही घटना पुण्यातील रविवार पेठ परिसरात घडली आहे. या घटनेत ‘डॅनी’ नावाच्या पोमेरेनियन जातीच्या कुत्र्याच्या पाठीचे हाड मोडले असून, त्याला अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खडक पोलिसांनी संबंधित श्वान मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

गणेश लक्ष्मण परदेशी असे या अमानुष व्यक्तीचे नाव आहे. परदेशी हा रविवार पेठेतील राजधानी प्लाझा या इमारतीत राहतो. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ९ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास परदेशी याने मद्यधुंद अवस्थेत आधी आपल्या पाळीव पोमेरेनियन कुत्र्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकल्यानंतर हा कुत्रा खालच्या मजल्यावरील पत्र्याच्या छतावर आदळला. या अमानुष प्रकारामुळे कुत्र्याला गंभीर दुखापत झाली असून कुत्र्याच्या पाठीचे हाड मोडले आहे. त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुण्यातील प्राणी निवारा आणि देखभाल क्षेत्रात काम करणाऱ्या ‘मिशन पॉसिबल फाउंडेशन’ या संस्थेच्या संस्थापक ६८ वर्षीय पद्मिनी पीटर स्टम्प यांनी खडक पोलीस ठाण्यात संबंधित मालकाविरोधात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती देताना स्टम्प यांनी सांगितले की, ९ ऑक्टोबर (शुक्रवारी) रोजी रात्री सुमारे ८ वाजून ४५ मिनिटांनी यश शेजवाल नावाचा स्थानिक रहिवासी गंभीर जखमी अवस्थेतील पोमेरेनियन कुत्र्याला घेऊन संस्थेच्या बचाव केंद्रात आला. कुत्र्याची अवस्था पाहून बचाव पथकाने तातडीने त्याला प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर कुत्र्याला इतक्या गंभीर स्वरूपाच्या दुखापती कशा झाल्या, याबाबत पथकाने शेजवाल यांच्याकडे चौकशी केली.

शेजवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कुत्रा त्यांचा शेजारी गणेश परदेशी याच्या मालकीचा आहे. परिसरातील काही रहिवाशांनी केलेल्या आरोपांनुसार, परदेशी हा नेहमी मद्यपान करत असे आणि त्यानंतर कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करत असे. तो कुत्र्याला हाताने तसेच पट्ट्याने मारत असे. इतकेच नव्हे, तर अनेकदा त्याला भिंतीवरही आपटत असे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

खडक पोलिसांनी गणेश लक्ष्मण परदेशी याच्याविरोधात भारतीय दंड संहितेतील संबंधित तरतुदी आणि प्राण्यांना क्रूरतेपासून संरक्षण देणाऱ्या कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.

Vedh News