सिनियर सिटीझन कार्ड देण्याचे आमिष दाखवून महिलेचे १४ लाख २७ हजार लुबाडले
पुणे – सिनिअर सिटीजन कार्ड देण्याचे आमिष दाखवून मोबाइलवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेला १४ लाख २७ हजार रुपयांचा गंडा घातला. याबाबत फकरी हिल्स भागात राहणार्या एका ७२ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर १३ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. बँक ऑफ इंडियातून अधिकारी राकेश बोलत असल्याचे सांगून बँकेकडून सिनिअर सिटीजन कार्ड देण्यात येणार आहे, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठविली. फिर्यादी महिलेने एपीके फाईल उघडताच चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलचा तांत्रिक ताबा घेतला. त्यानंतर चोरट्याने बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून १४ लाख २७ हजार ९९९ रुपयांची रक्कम काढून घेतली. पोलीस उपनिरीक्षक तांबोळी तपास करत आहेत.
सिनियर सिटीझन कार्ड देण्याचे आमिष दाखवून महिलेचे १४ लाख २७ हजार लुबाडले
