सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भीषण अपघात ; बंदोबस्तासाठी तैनात उपनिरीक्षकाचा मृत्यू ; ७ जण जखमी

नाशिक- वणीकडून भरधाव येणाऱ्या सियाज कारने पोलिसांसह भाविकांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला तर पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि दर्शनासाठी आलेले सात भाविक जखमी झाले आहेत. नवरात्रौस्तवाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त तैनात असताना हा अपघात घडला.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जखमीवर नाशिक जिल्हाधिकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, वाहतूक पोलीस सचिन राऊत हे जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच दर्शनासाठी आलेले कपिल साळी, मोरेश्वर पाटील, गोपाळ सोनवणे, दुर्गेश चौधरी, सोहम पवार, राजाराम जाधव आणि राधाबाई गावित हे भाविकही जखमी झाले आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज, रविवार (दि.१८) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सियाज कार (MH-१२-ML-७७४७) सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत होती. यावेळी अभोणा वळण रस्त्यावर नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तसेच वाहतूक वळविण्याच्या कामासाठी पोलीस तैनात होते. याचठिकाणी या कारने पोलिसांसह दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जोरदार धडक दिली. या कारमधील चार जणांपैकी दोनजण अपघातानंतर फरार झाले असून, कारमधील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोघे अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील देवठाण येथील असल्याची माहिती समोर आली आहे. कारमधून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन मुली ह्या अकोल्यातील निवासी आश्रमशाळेतील असल्याचे समजते. या अपघाताबाबत कळवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.






