फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, आरोपी फरार
बारामती – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गणेश रामदास मदने (रा. कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असताना आरोपीने तिच्याशी संपर्क वाढविला. तिच्यावर प्रेम असल्याचे सांगून लग्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच आपले सध्याचे लग्न मोडून पीडितेशी विवाह करणार असल्याचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून आरोपीने वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार पीडितेने दिली आहे.
दरम्यान, आरोपीने पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते प्रसारित करण्याची धमकी दिली. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. लग्नाबाबत दिलेली मुदत उलटून गेल्यानंतरही आरोपी प्रतिसाद देत नसल्याने पीडितेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या पीडितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. कुटुंबीयांनी तिला तातडीने बारामती येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर झालेल्या पोलिस चौकशीत प्रकरण उघडकीस आले. बारामती शहर पोलिसांकडून हे प्रकरण वडगाव निंबाळकर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पीडितेच्या जबाबावरून गुन्हा नोंदविण्यात आला.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
