ह्युंदाईच्या नव्या प्रकल्पामुळे पुण्याच्या औद्योगिक विकासाला गती; रोजगाराच्या संधी वाढणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

तळेगाव- पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसी येथे ह्युंदाई मोटर इंडियाच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार उपस्थित राहिल्या.
हा प्रकल्प पुण्यासह महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच वाहननिर्मिती क्षेत्रातील पूरक उद्योग, स्थानिक सुटे भाग उत्पादक आणि लघुउद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होतील.
आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि कुशल मनुष्यबळाच्या बळावर स्थानिक उद्योगांना अधिक सक्षम करण्यास या प्रकल्पाची मदत होईल. तसेच महाराष्ट्रातील वाहननिर्मिती क्षेत्राच्या विस्तारालाही चालना मिळेल.
शिक्षण, आयटी आणि उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले पुणे आता जागतिक दर्जाच्या वाहननिर्मितीचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. ह्युंदाईच्या या प्रकल्पामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.






