आरोग्य विभागाचे दोन सहाय्यक संचालक निलंबित ; कर्तव्यतील कसूर भोवली

पुणे – बालआरोग्य आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या कामकाजात गंभीर दुर्लक्ष व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पुण्यातील आरोग्य विभागाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाचे दोन सहाय्यक संचालक डॉ. राजकुमार जगताप आणि डॉ. राजश्री गजानन ढवळे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेशही आरोग्य विभागाने दिले आहेत.
डॉ. राजकुमार जगताप हे कुटुंब कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक आहेत. त्यांच्याकडे बालआरोग्यविषयक जबाबदारी आहे. तर, डॉ. राजश्री ढवळे या देखील याच विभागाच्या सहायक संचालक असून त्यांच्याकडे कुटुंब नियोजन कार्यक्रम राज्यभर राबवण्याची जबाबदारी आहे. त्यांचे कार्यालय औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव-१ डॉ. निपून विनायक यांनी सोमवारी (ता. १२) बालआरोग्य आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा आढावा घेतला होता.
या आढावा बैठकीत डॉ. जगताप आणि डॉ. ढवळे यांनी क्षेत्रभेटी न देता आपली नियंत्रकीय व पर्यवेक्षकीय जबाबदारी पार पाडली नसल्याचे समोर आले. तसेच त्यांना कामकाजाच्या सद्यस्थितीबाबत समाधानकारक माहिती सादर करता आली नाही. बालआरोग्य आणि कुटुंब नियोजन यांसारख्या संवेदनशील विषयांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आणि सोपविण्यात आलेल्या कामाबाबत कोणतीही आस्था नसल्याचा ठपका ठेवत शासनाने ही कारवाई केली आहे.






