पिंपरीत रिक्षा स्टँडवर बर्फ फोडण्याच्या टोच्याने जीवघेणा हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरीत रिक्षा स्टँडवर बर्फ फोडण्याच्या टोच्याने जीवघेणा हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 
Share

पिंपरी- रिक्षात बसताना आपल्या भावाला त्रास का देतो, असा जाब विचारत दोघांनी रिक्षाचालकावर बर्फ फोडण्याच्या टोच्याने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्याच्या मित्राच्या छातीवरही टोच्याने वार केले. ही घटना पिंपरीच्या आंबेडकर चौकातील रिक्षा स्टँडवर सोमवारी (दि. १२) दुपारी घडली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल उर्फ आण्णा दिलीप धोत्रे (वय ३८, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आदनान शरीफ कुरेशी (वय अंदाजे २५) आणि मुस्तफा उर्फ मुसा शरीफ कुरेशी (वय अंदाजे २२, दोघेही रा. खडकी बाजार, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल धोत्रे आणि त्यांचे मित्र कैलास हनुमंत म्हेत्रे हे आंबेडकर चौकातील रिक्षा स्टँडवर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी दोन्ही आरोपी तेथे आले. ‘रिक्षात बसताना आपल्या भावाला त्रास का देतो?’ असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादीशी वाद घातला. त्यानंतर आरोपीने बर्फ फोडण्याचा टोचा काढला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादीने तो वार चुकवला.

दरम्यान, कैलास म्हेत्रे हे वाद सोडवण्यासाठी मध्ये पडले असता आरोपीने त्यांनाही धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या छातीवर बर्फ फोडण्याच्या टोच्याने वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दलालवाड पुढील तपास करीत आहेत.

Vedh News