अप्पूघर परिसरात ४९ झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याचा आरोप ; ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, ‘आप’ची मागणी

अप्पूघर परिसरात ४९ झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याचा आरोप ; ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, ‘आप’ची मागणी
Share

पिंपरी- निगडी येथील अप्पूघर परिसरात ४९ झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याचा करार रद्द करावा, तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की या प्रकरणातील संबंधित ठेकेदारावर महाराष्ट्र वृक्ष जतन कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत तातडीने गुन्हा दाखल करावा. तसेच ठेकेदाराचा करार रद्द करावा, याशिवाय, या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा संबंधित ठेकेदाराला अभय दिल्याचा आरोप असलेल्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. तसेच कत्तल करण्यात आलेल्या झाडांच्या जागी तिप्पट संख्येने देशी प्रजातींची झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेच्याच मालकीच्या जागेत असा प्रकार घडत असेल, तर संबंधित ठेकेदारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या विभागाने काय केले, असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ‘आप’ने केली आहे.

या प्रकरणी सात दिवसांच्या आत ठोस कारवाई करण्यात यावी. अन्यथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, आप रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अंगद मुगळे, आप नेत्या कविता कोंडे देशमुख आदी उपस्थित होते.

Vedh News