लोहगाव-विमाननगरचे महसुली विभाजन; सर्व्हे क्रमांकांत बदल ; जमिनीचे व्यवहार करताना अशी घ्या खबरदारी

लोहगाव-विमाननगरचे महसुली विभाजन; सर्व्हे क्रमांकांत बदल ; जमिनीचे व्यवहार करताना अशी घ्या खबरदारी 
Share

पुणे -लोहगाव आणि विमाननगर हे दोन महसुली भाग स्वतंत्र करण्यात आले असून, त्यानुसार सर्व्हे क्रमांकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे संबंधित भागातील मालमत्ता, जमिनीचे व्यवहार आणि महसुली कामकाजाच्या दृष्टीने नागरिकांना आपल्या क्षेत्राची हद्द आणि सर्व्हे क्रमांकाची माहिती असणे आवश्यक झाले आहे.

कळस ते राहू या राज्य मार्गावरील धानोरी जकात नाका ते वाघोली हद्दीपर्यंतच्या (वॉटर पार्क रस्ता) परिसराचे महसुली विभाजन करण्यात आले आहे. या रस्त्याच्या उजव्या बाजूचा भाग विमाननगर महसुली हद्दीत, तर डाव्या बाजूचा भाग लोहगाव महसुली हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. या विभाजनानुसार दोन्ही भागांचे महसुली कामकाज स्वतंत्रपणे पाहिले जाणार आहे.

लोहगाव आणि विमाननगर हे महसुली भाग स्वतंत्र झाल्याने दोन्ही ठिकाणचे कामकाज स्वतंत्रपणे पाहिले जात आहे. लोहगावसाठी ग्राम महसूल अधिकारी म्हणून संजय शितोळे, तर विमाननगरसाठी गणेश घुमे हे कामकाज पाहत आहेत.

नागरिकांनी आपल्या जमिनीचा सर्व्हे क्रमांक, महसुली हद्द किंवा संबंधित कागदपत्रांबाबत काही शंका असल्यास संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घ्यावी. महसुली विभाजनानंतर निर्माण होणारा संभ्रम टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या मालमत्तेची नोंद आणि सर्व्हे क्रमांकाची अद्ययावत माहिती करून घ्यावी लागणार आहे.

महसुली विभाजनानंतर लोहगाव हद्दीतील सर्व्हे क्रमांक १ ते ८९ हे पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले असून सर्व्हे क्रमांक ९० पासून पुढील क्रमांकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित जमिनींचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी आपल्या जमिनीचा अद्ययावत सर्व्हे क्रमांक तपासून घेणे आवश्यक आहे. जमिनीचे दस्तऐवज, सातबारा उतारा, फेरफार नोंदी तसेच इतर महसुली कामकाज करताना योग्य महसुली विभागाची माहिती असणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः जुन्या सर्व्हे क्रमांकाच्या आधारे व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी नवीन क्रमांकाची खातरजमा करून घेणे गरजेचे आहे.

यापूर्वी विमाननगर परिसरातील सातबारा उतारा तसेच इतर महसुली कागदपत्रांवर महसुली भाग म्हणून लोहगावचा उल्लेख केला जात होता. मात्र, लोहगाव आणि विमाननगर हे दोन महसुली भाग स्वतंत्र झाल्यामुळे आता विमाननगर परिसरातील सातबारा उताऱ्यासह इतर महसुली कागदपत्रांवर संबंधित महसुली भाग म्हणून विमाननगरचा स्वतंत्र उल्लेख करण्यात येणार आहे.

Vedh News