दारुडा चढला मोबाइल टॉवरवर.. पुढे तीन तास चालला ‘शोले स्टाईल’ ड्रामा

पुणे- घरगुती भांडण झाले म्हणून दारू ढोसून एक तरुण थेट तीन मजली इमारतीच्या मोबाईल टॉवरवर चढला. तो वर चढल्याचे कळताच बघ्यांची गर्दी झाली. त्यातून वाहतूक कोंडी सुरू झाली. पोलिसांनी आणि अग्निशमन जवानांनी त्याला खाली आणण्याचे बरेच प्रयत्न केले. पण तो खाली उतरायला तयार नव्हता. हा शोले स्टाईल ड्रामा तब्बल तीन तास चालला. अखेर दारूच्या नशेत तो टॉवरवरच झोपला आणि मग त्याला खाली आणण्यात यश आले. हा सर्व प्रकार वाघोली येथे घडला. या प्रकारामुळे लोकांचे चांगलेच मनोरंजन झाले.
रोशन कुमार (वय-२७, रा. कात्रज, मूळ रा. बिहार) असे या तरुणाचे नाव. जीप वर चालक काम करणाऱ्या या रोशनचे घरगुती भांडण झाले होते. त्यामुळे तो दुचाकीवर गावाला निघाला होता. वाघोलीत आल्यानंतर त्याचा पुन्हा घरगुती वाद झाला. यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता तो सरळ पुणे नगर रस्त्यावर असणाऱ्या तीन मजली इमारतीच्या गच्चीवर असलेल्या मोबाईल टॉवर वर चढला.
तो वर चढल्याचे कळताच बघ्यांची गर्दी झाली. त्यातून वाहतूक कोंडी सुरू झाली. त्याला खाली आणण्याचे बरेच प्रयत्न झाले. याबाबतची माहिती समजताच पोलीस आणि अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले. सर्वजण त्याला सतत खाली उतरण्याचे आवाहन करीत होते. मात्र तो खाली उतरायला तयार नव्हता.
इमारतीवर चढून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप व कर्मचाऱ्यांनी तसेच अग्निशमन कर्मचारी यांनी त्याच्याशी मोबाईल वर संपर्क साधून व स्पीकर वर त्याला खाली येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता. अग्निशमन कर्मचारी रेस्क्यू करण्यासाठी वर चढण्याचा प्रयत्न करू लागल्यावर त्याने खाली उडी टाकण्याची धमकी दिली.
अखेर दारूच्या गुंगीत तो टॉवरवरच्या प्लॅटफॉर्मवर झोपी गेला. यानंतर साईनाथ मोरे, राजेंद्र फुंदे, सागर जानकर हे पी एम आर डी ए अग्निशमन कर्मचारी टॉवरवर चढले. अखेर रात्री सव्वाआठच्या सुमारास त्याला खाली आणण्यात यश आले. अशा तऱ्हेने तीन तास चाललेले नाट्य संपले. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आपल्या जबाबत त्याने सर्व कहाणी सांगितली. ‘माझे घरगुती वाद झाले. मी दारू पिलो व वाघोलीत दुचाकीवर आलो. यानंतर मी जाऊन टॉवर वर चढलो’






