पुण्यात आणखी एका विवाहितेची आत्महत्या..; ‘माहेरचं घर सासूच्या नावावर कर नाहीतर……’

पुण्यात आणखी एका विवाहितेची आत्महत्या..; ‘माहेरचं घर सासूच्या नावावर कर नाहीतर……’
Share

पुणे- पुण्यात एका पाठोपाठ हुंडाबळीच्या घटना घडत असल्यामुळे पुणे हे खरोखरीच शिक्षणाचे माहेरघर आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात आणखी एका संगणक अभियंता असलेल्या सुशिक्षित विवाहितेने घटस्फोटासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना पुण्यातील मुंढवा भागात घडली.

त्रिष्णा राहुल सकपाळ (वय 33, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजेसासू शकुंतला साळुंके (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, हडपसर) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्रिष्णा हिचे वडील बाळकृष्ण निकम (वय ७४ , रा. केशवनगर) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिष्णा हिचा विवाह २०१८ मध्ये राहुल सकपाळ याच्याशी झाला होता. लग्नात तिच्या माहेरच्यांनी १३ तोळे सोन्याचे दागिने दिले होते. त्रिष्णा ही एका आयटी कंपनीत नोकरीस होती. संपूर्ण पगार देण्यासह माहेरची सदनिका सासूच्या नावावर करण्यासाठी तिचा सतत छळ सुरू होता. तसेच, सासऱ्यांनी तिच्या नावावर एक कोटीची सदनिका घेऊन देण्याचा तगादा लावला होता. वारंवार होणाऱ्या मारहाण व छळामुळे दोघे पती-पत्नी २०२१ मध्ये केशवनगर येथे वेगळे राहू लागले. मात्र, तिथेही पतीने मारहाण करून घराबाहेर काढल्याने ती माहेरी निघून आली होती. त्यानंतर पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता.

दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास तृष्णा हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात पती, सासू, सासरे, नणंद आणि आजेसासू यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असून, तेच माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत,’ असा उल्लेख केला आहे.

Vedh News